Thursday 29 August 2013

मेघ लिला

कोण जाणे काय आले ह्या घनांच्या मनात ?
कोसळता चार सरी उर्वी सुखावली क्षणात ||

कोपला होता सूर्य नभी लाही होती तनात |
पण शरण आला ह्या घनांपुढे कुढू लागला तो मनात ||

स्वैर गार वारा सुसाट सुटला रानात |
जेव्हा काळे ढग दाटले ह्या गूढ गगनात ||

निसर्गाच्या ह्या लिलेपुढे कर माझे जुळतात |
कोण जाणे काय आले ह्या घनांच्या मनात ||

-ॐकार

Link to my English writings. Click here.

Wednesday 28 August 2013

रोहिणी

राखून काही क्षण हाती, न्याहाळता ह्या अंबरासी;
सजलेली दिसते चंद्र ताऱ्यांची मैफिल गगनाच्या उंबर्‍याशी।

असंख्य आहेत चांदण्या, त्या चंद्राच्या अंगणी;
पण चंद्राला भावणारी एकच ती ही रोहिणी।

भाबड्या त्या रोहिणीला स्वतःची ओळखही नसे;
जगी बोलतात सारे, ती तर चंद्राच्या जवळच वसे।

सावली म्हणावे का हिला चंद्राची? हा प्रश्न सुटत नाही;
अमावस्येच्या राञी मग ही वेडी कोणाची वाट पाही?

पौर्णिमेच्या राञी चंद्रासह ही हसे;
रूसता चंद्र विवंचनेत ही, त्याला समजवावे कसे?

भाग्यवान तो चंद्र ज्याच्या आयुष्यात अशी ही रोहिणी;
आसमंतात सार्‍यानाच वाटतो ह्या चंद्राचा हेवा क्षणोक्षणी।

-ॐकार


Link to my English writings. Click here.